Pages

Saturday, November 12, 2016

से नो टू होमवर्क

‘ से नो टू  होमवर्क ’

                       बालकांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याने त्रस्त असणाऱ्या  आपल्या  शिक्षणव्यवस्थेचे लक्ष वेधून घेणारी घटना सध्या स्पेन मध्ये घडत आहे.सबंध स्पेनच नव्हे तर जगभरातील शिक्षणतज्ञ या घटनेविषयी चर्चा करत आहेत.एव्हा बायलेन या स्पेनमधील महिलेने तिच्या  मुलांना दिल्या जाणाऱ्या गृहपाठावर आक्षेप घेतला आहे.एव्हा यांना ३ मुले असून ती अनुक्रमे ८, १० व १२ वर्ष्याची आहेत.ही तिन्ही मुले एकाच प्राथमिक शाळेत जातात मात्र त्यांना दिला जाणारा गृहपाठ मुलाचे बालपण हिरावून घेणारा असून  शाळेतील शिक्षकांवरच असा  गृहपाठ देण्याचे बंधन असल्याचे तिचे निरीक्षण आहे. या गृहपाठमुळे मुलांना गोष्टी ऐकण्यास,मित्रांसोबत धमाल मस्ती करण्यास,आजी –आजोबांशी गप्पा मारण्यासाठी  वेळच मिळत नाहीये.हे गृहपाठ पारंपारिक शिक्षण व्यवस्थेवर आधरित रट्टा मारो पद्धतीचे  असून यात आधुनिक शिक्षण प्रणालीचा अभाव जाणवतो असे निरीक्षण तिने नोंदवले आहे.हा विरोध दर्शवण्यासाठी तिने मागील वर्षी जून मध्ये स्पेन सरकारच्या विरोधात एक पिटीशन दाखल केली आहे.तिच्या या चळवळीला आता  प्रचंड पाठिंबा मिळत असून सरकारी यंत्रणेवर याबाबतचा  निर्णय घेण्यासाठी दबाव वाढत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्पेनमधील या परिस्थितीचे पडसाद आता स्कॉटलंड मध्ये उमटले आहेत. मुलांना देण्यात येणारा  गृहपाठ या विषयावर स्कॉटलंड मध्ये सार्वमत घेतले असून तिथल्या जनतेने गृहपाठ बंद करण्याच्या बाजूने आपला निर्णय दिला आहे.स्कॉटलंड मध्ये आता गृहपाठाऐवजी मुलांना आवडतील ती पुस्तके वाचण्यास,आवडीचे खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
                       या  घटनेतील दोन  बाबी भारताच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.पहिली म्हणजे ही महिला शिक्षण व्यवस्थेतील आशयाच्या ओझ्याबाबत आक्षेप घेत आहे.अभ्यासक्रमातील आशयात्मक बोजडपणा मुलांचा आनंद हिरावून घेतोय असे तिला वाटते आहे. हा देश  दप्तराच्या भौतिक ओझ्याऐवजी आशयात्मक ओझ्याबाबत  विचार करत आहे.भारतात   प्रा.यशपाल यांच्या समितीने (सन1993)  मुलाचे आशयात्मक ओझे कमी करावे अशी शिफारस मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली होती,मात्र आपण त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले नाही.आता दप्तराच्या ओझ्याचा  मुद्दा न्यायालयात गेल्यानंतर आशयात्मक ओझ्याबाबत काही निर्णय होण्याची शक्यता मावळत आहे. केवळ महाराष्ट्राचा विचार करायचे झाल्यास पहिल्या वर्गातील मुल वर्षातील २२०-२४० (सरासरी) कार्यदिनामध्ये तब्बल ११८ उपघटक समजून घेण्याचा प्रयत्न करते. ही बाब त्याच्यावरील आशयात्मक ओझ्याबाबतचे चित्र दर्शवण्यास पुरेशी आहे .दुसरी महत्वाची बाब म्हणजे शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करावे अशी मागणी ती महिला करत आहे.पारंपारिक शिक्षण व्यवस्था पूर्णतः बदलून टाकण्याची मागणी एका महिला पालकाने अशी जाहीररीत्या करावी ही एक क्रांतिकारक बाब मानवी लागेल. पालकांची ही जागरूकता आपल्याकडील पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.एकीकडे आमच्या देशातील तथाकथित सुशिक्षित  पालक त्यांच्या मुलांना एका क्लास मधून दुसऱ्या क्लास मध्ये घेवून जाण्यात धन्यता मानतात तर इतर प्रगत देशातील पालक मुलांचे बालपण जपण्यास महत्व देतात.नवीन शैक्षणिक धोरण कसे असावे ? याबाबत थेट जनतेतूनच अशा  शिफारशी येणे हे त्यांच्या शिक्षण विषयक जागरूकतेचे दर्शक मानावे लागेल. शिक्षणातील आधुनिकीकरण हे धोरण निर्मात्यांचे विचार,मूल्यमापन पद्धती अन शिक्षकांना अध्यापनात सहायभूत ठरतील  अशा साधनांची उपलब्धता याबाबत असायला हवे. केवळ लोकाकर्षक घोषणा करून आधुनिकीकरण करण्याऐवजी  विशिष्ट क्षेत्रात केलेला तंत्रज्ञानांचा प्रभावी वापर देशाच्या प्रगतीस सहायभूत ठरेल. पुढच्यास ठेस मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे आपण लवकरच पावले उचलणे आवश्यक वाटते.कारण या दोन्ही बाबतीत अमुलाग्र बदल करण्यास आपल्याला वाव आहे.
                          एव्हा यांच्या या  आंदोलनाला विरोध करणारे लोक देखील त्यांची बाजू मांडत आहेत.या विरोधकांच्या हाती पडलाय तो OECD चा अहवाल. या महिलेच्या  मताशी सकृतदर्शनी  विरोधाभास दर्शवणारी आकडेवारी OECD ने प्रकाशित केली आहे. स्पेन हा सर्वाधिक काळ गृहपाठ करणाऱ्या देशांच्या क्रमवारीत ११  व्या स्थानावर आहे. या क्रमवारीत शांघाय (चीन) हा प्रांत अग्रस्थानी  असून त्या पाठोपाठ रशिया,सिंगापूर,कझाकस्तान अशी क्रमवारी आहे.भारताबाबतची आकडेवारी OECD कडे उपलब्ध नाहीये. स्पेन मधील मुले एका आठवड्यात सरासरी साडे सहा तास गृहपाठ करतात तर अग्रस्थानी असणाऱ्या शांघाय मधील मुले पावणे तेरा तास गृहपाठ करतात. या आकडेवारीचा संबंध पिसा टेस्ट सोबत जोडण्यात आला असून गृहपाठाचे तास कमी केल्यानंतर स्पेन सह फिनलंड ची क्रमवारीत घसरण झाली आहे असा निकर्ष या अहवालात मांडला आहे.पिसा टेस्ट मधून  विशिष्ट विषयातील क्षमताचे मूल्यमापन  केले जात असले तरी देखील  OECD चा हा निष्कर्ष भारतीय पालकांच्या मनात आनंद निर्माण करू शकेल.
                                 OECD चा अहवाल अन एव्हा यांची मागणी या दोन्हीचा भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि मूल्यमापन पद्धतीतील बदल आपण प्राधान्यक्रमाने करायला हवेत असे दिसून येते.अनेक आंतरराष्ट्रीय अहवालामध्ये भारताची शिक्षणविषयक आकडेवारी उपलब्ध नसणे हे आपले प्रशासकीय अपयश मानावे लागेल.अशा आकडेवारीमुळे महत्वपूर्ण निर्णय घेताना वस्तुस्थिती समोर यायला मदतच होते.मात्र शिक्षकांकडून माहिती गोळा करणारी यंत्रणा यावर काही प्रक्रिया करते का ? असा प्रश्न यानिमित्ताने  निर्माण होतो.
                   केवळ अधिक वेळ गृहपाठ केला म्हणून मुले यश मिळवतात असे शांघायच्या कामगिरीकडे पाहून म्हणता येईल तर फिनलंड मात्र या धारणेला तडा जाईल अशी वस्तुस्थिती समोर आणतोय.त्यामुळे मुळात किती वेळ गृहपाठ केला? यापेक्षा काय गृहपाठ केला ? अन तो कसा केला ? यावर आता  निश्चित विचार मांडावे लागतील. अध्यापन पद्धतीमधील बदल न स्वीकारण्याची मानसिकता शिक्षकांना बदलावी लागेल. प्रत्येक मुल शिकू शकत हा आत्मविश्वास शिक्षकांमध्ये यायला हवा.पारंपारिक पद्धतीचे अध्यापन मुलांचे बालपण हिरावून घेते आहे.मुलांना दिला जाणारा गृहपाठ हा त्यांच्या पालकांचीच परीक्षा घेवू  पाहतोय. शाळा, क्लास अन शेवटी गृहपाठ या चक्रात बालकांची सृजनशीलता मारली जाते आहे. कल्पनाविश्वात  रमायला,बालपणाचा आनंद घ्यायला  त्याला वेळच नाहीये.           
                                   शैक्षणिक धोरण विषयक चर्चा आता शेवटच्या टप्प्यात येवून पोहोचल्या आहेत. मात्र आपले धोरण अजून ही पास कि नापास यातच अडकले आहे.माझ्या मुलांना वाचनाची आवड आहे मात्र त्यांना कधीही वाचनात्मक  गृहपाठ दिला जात नाही अशी एव्हा यांची तक्रार पालकांच्या बदलत्या अपेक्षांचे प्रतिक आहे.या अपेक्षा पूर्ण करण्यास आपली शिक्षण व्यवस्था तयार आहे कि नाही? हे येणारा काळच ठरवेल. मात्र यानिमित्ताने शिक्षण विषयक निर्णय कोणत्या पद्धतीने घेतले जावेत याचा वस्तुपाठ आपल्यासमोर येतो आहे. घेतलेला निर्णय अंमलात आणण्यासाठी शिक्षकांची मानसिक व कौशल्यविषयक तयारी असणे किती आवश्यक असते , हेदेखील यानिमित्ताने समोर आले आहे.बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वतः हे बदल स्वीकारले  तर अशी वेळ कदाचित येणार नाही.
                                                                              रणजितसिंह डिसले

No comments:

Post a Comment